डॉ. बाबासाहेब आंबेडकर: 'जय भीम' हा नारा कुणी दिला?

बाबू हरदास आणि आंबेडकर
  • Author, तुषार कुलकर्णी
  • Role, बीबीसी मराठी

महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि आंबेडकरांशी भावनिक ऋणानुबंध जपणारे कोट्यवधी लोक एकमेकांना अभिवादन करताना 'जय भीम' म्हणतात.

'जय भीम' या शब्दावर हजारो नव्हे तर लाखो गाणी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात गायली जातात. तामिळनाडूत पण या एका शब्दाने सध्या वेड लावलं आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर हे होते. त्यांचा गौरव म्हणून त्यांची आठवण म्हणून आंबेडकरी चळवळीशी बांधिलकी असलेले लोक 'जय भीम' म्हणतात.

'जय भीम' केवळ एक अभिवादनाचा शब्दच न राहता आज तो आंबेडकरी चळवळीचा नारा झाला आहे. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते या शब्दाला तर चळवळीचा प्राण म्हणतात.

हा शब्द अभिवादनापासून क्रांतीचे प्रतीक कसा झाला याचा प्रवास देखील रंजक आहे. 'जय भीम' हा शब्द केव्हा रूढ झाला आणि महाराष्ट्रात तयार झालेला हा शब्द भारतभर कसा पसरला हे शोधण्याचा प्रयत्न या लेखातून करण्यात आला आहे.

'जय भीम' नारा कुणी दिला?

'जय भीम'चा नारा आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते बाबू हरदास एल. एन. (लक्ष्मण नगराळे) यांनी 1935 मध्ये दिला अशी नोंद आहे.

बाबू हरदास हे सेंट्रल प्रोव्हिन्स-बेरारच्या काउन्सिलचे आमदार होते आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणारे एक प्रखर कार्यकर्ते होते.

आंबेडकर

फोटो स्रोत, Getty Images

नाशिकच्या काळाराम मंदिरातला लढा, चवदार तळ्याचा सत्याग्रह यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घराघरात पोहोचले होते. त्यानंतर डॉ. आंबेडकरांनी महाराष्ट्रातून दलित नेत्यांची जी फळी उभी केली होती त्यापैकी बाबू हरदास एक होते.

बाबू हरदास यांनीच 'जय भीम'चा नारा दिल्याची नोंद रामचंद्र क्षीरसागर यांच्या 'दलित मूव्हमेंट इन इंडिया अँड इट्स लीडर्स' या पुस्तकात आहे.

गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर नियंत्रण यावे तसेच समतेविषयक विचार गावोगावामध्ये पोहोचावेत हा विचार घेऊन डॉ. आंबेडकरांनी समता सैनिक दलाची स्थापना केली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाचे ते सचिव होते.

'जय भीम'चा नारा कसा तयार झाला याबद्दल कसा तयार झाला असं विचारले असता दलित पॅंथरचे सहसंस्थापक ज. वि. पवार सांगतात, "कामठी आणि नागपूर परिसरातील कार्यकर्त्यांचे संघटन बाबू हरदास यांनी उभे केले होते. या दलातील स्वयंसेवकांना त्यांनी सांगितले होते की एकमेकांना अभिवादन करताना नमस्कार, रामराम, किंवा जोहार मायबाप न म्हणता 'जय भीम' असे म्हणावे. आणि 'जय भीम'ला प्रत्युत्तर म्हणून 'बल भीम' म्हणावे."

जय भीम तमिळ सिनेमा

फोटो स्रोत, @2D_ENTPVTLTD

"ज्या प्रमाणे मुस्लीम लोक 'सलाम वालेकुम' या अभिवादनाला उत्तर देताना 'वालेकुम सलाम' म्हणतात तसे 'जय भीम'ला उत्तर म्हणून 'बल भीम' म्हणावे असे त्यांनी सुचवले होते. पण पुढे 'जय भीम'ला उत्तर 'जय भीम'नेच देण्याची पद्धत रूढ झाली आणि तीच कायम राहिली," अशी माहिती ज. वि. पवार यांनी दिली.

पवार यांनी राजा ढाले, नामदेव ढसाळ यांच्यासोबत काम केले आहे तसेच त्यांचे दलित पँथरवरील पुस्तकही प्रकाशित आहे.

ते पुढे सांगतात, "1938 साली औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात मकरंदपूर येथे भाऊसाहेब मोरे या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी एक सभा भरवली होती. या सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर देखील उपस्थित होते. त्या सभेत मोरे यांनी जनतेला सांगितले की यापुढे आपण एकमेकांना अभिवादन करताना 'जय भीम'च म्हणत जाऊ."

हरदास
फोटो कॅप्शन, बाबू हरदास यांनी समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांना लिहिलेल्या पत्राची सत्यप्रत ज. वि. पवार यांच्या संग्रही आहे.

"बाबू हरदास यांनी हा नारा दिला तर भाऊसाहेब मोरेंनी या नाऱ्याला समर्थन दिले," असं पवार सांगतात.

'थेट बाबासाहेबांनाच जय भीम म्हटलं तेव्हा'

"डॉ. आंबेडकरांच्या हयातीतच 'जय भीम' या अभिवादनाला सुरुवात झाली. चळवळीतील कार्यकर्ते एकमेकांना तर 'जय भीम' म्हणतच असत पण एखादा कार्यकर्ता थेट डॉ. आंबेडकरांना सुद्धा 'जय भीम' म्हणत असे. त्या वेळी बाबासाहेब त्या व्यक्तीच्या अभिवादनाचे उत्तर केवळ स्मित हास्य करुन देत असत," असं माजी न्यायाधीश सुरेश घोरपडे सांगतात.

बाबासाहेब आंबेडकर

न्या. सुरेश घोरपडे हे सत्र न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आहेत, विदर्भातील दलित चळवळीचे ते अभ्यासक आहेत. बाबू हरदास यांच्या कार्यावर त्यांनी आतापर्यंत अनेक लेख लिहिले आहेत तसेच व्याख्याने दिली आहेत.

ते सांगतात, "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रात दलित उद्धारासाठी जे आंदोलन सुरू केले त्यात अनेक तरुण स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले. त्यापैकी एक बाबू हरदास एल. एन. होते."

'जय भीम प्रवर्तक बाबू हरदास एल. एन.'

"किशोरवयापासूनच त्यांना सामाजिक कार्याची आवड होती. त्यांचा जन्म 6 जानेवारी, 1904 ला झाला होता आणि 1920 मध्ये ते सामाजिक चळवळींशी जोडले गेले. नागपूर येथील पटवर्धन हायस्कूलमधून ते मॅट्रिक पर्यंत शिकले, त्यांना 'जय भीम प्रवर्तक' याच विशेषणाने ओळखले जाते," असे माजी न्यायाधीश सुरेश घोरपडे सांगतात.

"आंबेडकरांच्या प्रेरणेनी त्यांनी कामठी येथे 1924 साली संत चोखामेळा वसतिगृहाची स्थापना केली. यामुळे खेडोपाड्यातून आलेल्या विद्यार्थ्यांची निवासाची सोय झाली. त्यांनी कष्टकरी वर्गातल्या विद्यार्थ्यांसाठी रात्रशाळा देखील सुरू केल्या होत्या. त्यांचे इंग्रजी उत्तम होते आणि बहुजन समाजातल्या मुलांना इंग्रजी यावे असं त्यांना वाटत असे त्यातूनच त्यांनी अशा विद्यार्थ्यांना इंग्रजीचे शिक्षण देण्यास सुरुवात केली," असे न्या. घोरपडे सांगतात.

बिडी मजूर

फोटो स्रोत, Getty Images

"1925 साली त्यांनी बिडी मजुरांची संघटना स्थापन केली. विदर्भातील दलित आणि आदिवासी समाजातील लोक तेंदू पत्ते गोळा करत, बिडी कारखान्यांमध्ये काम करत तसेच घरोघरी बिडी वळण्याचे काम देखील चाले. बिडी कारखानदार आणि कंत्राटदार अशा लोकांची पिळवणूक करत असत. बाबू हरदास यांनी त्यांची संघटना उभी करून त्यांना त्यांच्या हक्काचा पैसा मिळवून दिला," असे न्या. घोरपडे सांगतात.

बिडी मजुरांच्या संघटनेचे काम केवळ विदर्भापुरतेच मर्यादित राहिले नाही. 1930 साली त्यांनी मध्यप्रदेश बिडी मजूर संघाची स्थापना केल्याची नोंद रामचंद्र क्षीरसागर यांच्या 'दलित मूव्हमेंट इन इंडिया अँड इट्स लीडर्स, 1857-1956' या पुस्तकात आहे.

"1932 साली डिप्रेस्ड क्लास मिशनचं दुसरं अधिवेशन कामठी येथे झालं होतं. बाबू हरदास हे स्वागत समितीचे अध्यक्ष होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्वागत त्यांनी केले होते. डॉ. आंबेडकरांच्या कामठी येथील भेटीनंतर त्यांचा या चळवळीतील उत्साह कैकपटींनी वाढला," असं न्या. घोरपडे सांगतात.

1927 साली त्यांनी 'महारठ्ठा' नावाचे पत्रक सुरू केले होते अशी नोंद वसंत मून यांनी लिहिलेल्या 'वस्ती' या पुस्तकात आहे. या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद देखील उपलब्ध आहे. गेल ऑम्वेट यांनी वस्तीचा अनुवाद 'ग्रोइंग अप अनटचेबल' असा केला आहे.

'बाबू हरदास हे कवी आणि लेखक होते,' असे वसंत मून लिहितात.

'मी आंबेडकरांच्या पक्षाचा आहे'

1937 साली विधानसभा निवडणुकीसाठी डॉ. आंबेडकरांच्या स्वतंत्र मजूर पक्षातर्फे त्यांनी उमेदवारी देण्यात आली. त्यांच्याविरोधात एक धनाढ्य व्यक्ती उभी होती. या व्यक्तीचा उल्लेख वसंत मून यांनी 'लाला' असा केला आहे.

या लालांचा एक कार्यकर्ता हरदास यांच्याकडे आला आणि त्याने हरदास यांना आपला अर्ज परत घेण्यास सांगितले. पाहिजे ती किंमत लाला देण्यासाठी तयार आहे असे तो म्हणाला. पण हरदास यांनी यास नकार दिला.

"मी आंबेडकरांच्या पक्षातर्फे उभा आहे असं ते म्हणाले. आम्ही भीक मागणे केव्हाच सोडून दिले आहे. आता आमच्या हक्काचं आम्ही मिळवून राहू," असं त्यांनी त्या व्यक्तीस ठणकावून सांगितल्याचं वसंत मून लिहितात.

ही गोष्ट तिथेच संपत नाही. त्यानंतर या लालांनी बब्बू उस्ताद नावाच्या एका महाकाय पैलवानाला बाबू हरदास यांच्याकडे पाठवले. बाबू हरदास यांना तो म्हणाला, 'तुमची उमेदवारी परत घेण्यासाठी शेटजींनी 10 हजार रुपये पाठवले आहे जर तुम्ही हे घेतले नाही तर ते तुमचा खून देखील करतील.'

यावर हरदास म्हणाले, 'मला माहीत आहे जर मला काही बरं वाईट झालं तर ते देखील जिवंत राहणार नाहीत. यावर बब्बू उस्ताद म्हणाला ती तर नंतरची गोष्ट राहील पण तुमचा जीव गेल्यावर त्याचा काय फायदा.' यावर देखील हरदास मागे हटले नाहीत. ते म्हणाले 'आपण बघू पुढे काय होतं,' ते असं म्हटल्यावर बब्बू उस्ताद तिथून निघून गेला.

जय भीम

फोटो स्रोत, Getty Images

विरोधकाकडे पैसा आणि ताकद असून देखील बाबू हरदास ही निवडणूक जिंकले आणि सेंट्रल प्रोव्हिन्स-बेरारच्या काउन्सिलवर ते गेले.

1939 साली त्यांचा क्षयरोगाने मृत्यू झाला. त्यांच्या अंत्ययात्राला दलित, मजुरांचा जनसागर लोटला होता. कामठी आणि नागपूर परिसरातील दलित तर आलेच होते पण त्याचबरोबर भंडारा, चंद्रपूर या भागातील बिडी मजूर देखील त्यांचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी कामठी येथे आले होते.

"त्यांच्या निधनांतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते माझा उजवा हात गेला," असं न्या. घोरपडे सांगतात.

कामठी येथील कऱ्हाण नदीच्या काठावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. कामठी येथे त्यांचे स्मारक उभरण्यात आले आहे.

"एखादा धुमकेतू आकाशात तळपावा, अन् त्याच्या लख्ख उजेडाने डोळे दिपून जावे पण क्षणार्धातच तो नाहीसा व्हावा असं हरदासच्या बाबतीत आम्हाला झालं," असं मून लिहितात.

बाबू हरदास यांच्या जीवनावर 'बोले इंडिया जय भीम' हा सुबोध नागदेवे यांचा मराठी चित्रपट देखील आला आहे.

'जय भीम' का म्हटलं जातं?

बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. त्यांच्या नावाचे लघुरूप घेऊन त्यांच्या नावाचा जयजयकार करण्याची पद्धत सुरुवातीला महाराष्ट्रात रूढ झाली आणि हळुहळू जय भीम संपूर्ण भारतात म्हटलं जाऊ लागलं असं खासदार डॉ. नरेंद्र जाधव म्हणतात.

डॉ. जाधव यांनी 'आंबेडकर - अवेकनिंग इंडियाज सोशल कॉन्शन्स' हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाला डॉ. 'आंबेडकरांचे वैचारिक चरित्र' म्हटलं जातं.

जय भीम

फोटो स्रोत, Getty Images

डॉ. जाधव सांगतात, "जय भीमचा नारा बाबू हरदास यांनी दिला. हा सर्व दलितांसाठी महत्त्वाचा जयघोष आहे. ज्या जातीजमाती हीन-दीन जीवन जगत होत्या, त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी माणूस म्हणून जगायला शिकवले. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आज आम्हाला देवाच्या ठिकाणी आहेत.

"त्यांनी अनुसूचित जाती-जमातीतील लोकांमध्ये स्वयंभाव जागवला, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आणि मार्ग दिला. त्यांच्या प्रथम नावाचे लघुरूप करून त्यांचा जयघोष करणे, त्या भीमाचा जयघोष करणे क्रमप्राप्त आहे," असं डॉ. जाधव सांगतात.

'जय भीम ही समग्र ओळख'

जय भीम हा नारा एक ओळख झाल्याचं मत ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक उत्तम कांबळे यांनी मांडले आहे. ते सांगतात, "जय भीम हे केवळ एक अभिवादन नाही तर ती एक समग्र ओळख झाली आहे.

"या ओळखीचे विविध पदर आहेत. 'जय भीम' म्हणजे संघर्षाचे प्रतीक झाले, ती सांस्कृतिक ओळख देखील झाली आहे, त्याच बरोबर राजकीय ओळख देखील आहे, आंबेडकरी चळवळीशी असलेले नाते देखील यातून दिसते हा उद्गार सर्व प्रकारच्या अस्मितेचं प्रतीक बनला आहे. 'जय भीम' ही क्रांतीची समग्र ओळख बनली आहे असं मला वाटतं," असं उत्तम कांबळे सांगतात.

कायदा मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर डॉ. आंबेडकर मुंबईत परतले (18 नोव्हेंबर, 1951)

फोटो स्रोत, OTHER

फोटो कॅप्शन, कायदा मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर डॉ. आंबेडकर मुंबईत परतले तेव्हा. (18 नोव्हेंबर, 1951)

"त्याच बरोबर 'जय भीम' हा चळवळीचा आयकॉन बनला आहे. सूर्याचा चित्रपट पाहिला असेल तर तुमच्या लक्षात येईल की त्यात कुठेच थेट 'जय भीम' हा शब्द वापरण्यात आला नाही. पण आंबेडकरांचा 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' हा संदेश त्यात देण्यात आला आहे. त्यांनी 'जय भीम' हे क्रांतीच्या आयकॉनच्याच रूपात दाखवले आहे," असं उत्तम कांबळे सांगतात.

'जय भीम' हा शब्द ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे यांना आंबेडकरी चळवळीतील सज्जतेचे प्रतीक वाटतो. ते सांगतात, 'जय भीम' म्हणणे हे केवळ नमस्कार, नमस्ते या सारखे नाही सहज सोपे नाही, तर त्यातून आपली आंबेडकरी विचारधारेशी जवळीक आहे हे सांगणे अभिप्रेत आहे. कुठेही लढा द्यायची गरज असेल, संघर्षाची तयारी असेल तर त्यासाठी मी सज्ज आहे हे या शब्दातून प्रतीत होते.

'जय भीम'महाराष्ट्राबाहेर केव्हापासून म्हटले जाऊ लागले?

उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश या हिंदी भाषक राज्यांमध्ये 'जय भीम' चा नारा सहजपणे ऐकायला मिळतो.

पंजाबमध्ये देखील आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार प्रसार झाला आहे. या ठिकाणी आता केवळ नारेच नाही तर गिन्नी माही या लोकप्रिय गायिकेनी नऊ वारी साडी नेसून 'जय भीम - जय भीम, बोलो जय भीम' हे गाणे देखील गायले आहे.

उत्तर प्रदेशात चंद्रशेखर आझाद 'रावण' यांनी आपल्या संघटनेला 'भीम आर्मी' असं नाव दिलं आहे.

दिल्लीमध्ये जेव्हा नागरकित्व दुरुस्ती कायद्याविरोधात (CAA) आंदोलन झाले तेव्हा मुस्लीम समुदायातील आंदोलकांनी डॉ. आंबेडकरांचे फोटो झळकावले होते.

गिन्नी माही
फोटो कॅप्शन, पंजाबमधील गायिका गिन्नी माही

'जय भीम'चा नारा हा केवळ एका समुदायापुरता आणि भौगोलिक सीमेपुरता मर्यादित राहिलेला नाही याचे हे निदर्शक आहे.

हा बदल कसा घडला असे विचारले असता डॉ. नरेंद्र जाधव सांगतात, "बाबासाहेबांचे महत्त्व आणि विचारांचा प्रसार जसा जसा वाढला तसा हा नारा सर्वव्यापी बनत गेला.

"मंडल आयोगानंतर देशात एक वैचारिक घुसळण झाली. केवळ दलितच नाही तर इतर कनिष्ट जातींमध्ये देखील चेतना निर्माण झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मानवाधिकाराचे, शिक्षणाचे प्रतीक बनले आणि सर्व देशात 'जय भीम' म्हटले जाऊ लागले."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)